

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ प्राचार्य योगानंद काळे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
स्वदेशी जागरण मंचाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, इतिहास याचे त्यांचे दीर्घचिंतन होते. त्यांनी स्वत: ‘स्वदेशी’ विषयावर पुस्तके लिहिली आणि त्यातून प्राप्त होणारी रक्कम स्वदेशी जागरण मंचाच्या चळवळीला दिली. विदर्भाचा विकास, देशाची आर्थिक धोरणे यावरही त्यांनी विपूल लेखन केले. जनसंघ काळापासून त्यांनी स्वत:ला राष्ट्रकार्यात वाहून घेतले होते. त्यामुळे सातत्याने त्यांची भेट व्हायची आणि अनेक विषयांवर त्यांचे मार्गदर्शनही प्राप्त व्हायचे. त्यांच्या निधनाने नागपूरच्या सामाजिक, शैक्षणिक वर्तृळाची हानी झाली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.