

नागपूर : विरोधकांना राज्य दिवाळखोर दाखवायची घाई झालेली आहे. पण, राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेले नाही. देशातील मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अव्वल आहे. याचा अर्थ आमच्याकडे खूप पैसे आहेत असा दावा मी करत नाही, पण हाती घेतलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेवर उपस्थित केलेले आरोप फेटाळून लावले. त्याचवेळी ठाकरे ब्रँडसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या एसपी ब्रँडचा फुगा फुटेल या भीतीमुळेच विरोधकांनी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांकडे पाठ फिरविल्याचा दावाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारमधील मंत्री उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेवरही सवाल केले. विरोधी पक्षाने बहिष्काराची परंपरा पाळत यंदाही सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. मात्र, त्यांची पत्रकार परिषद ही निराशेने भरलेली आणि त्यात केवळ त्रागा होता.
विरोधकांच्या पत्रकार परिषदेत अनेक गमतीदार गोष्टी घडल्या. उदाहरणार्थ, उबाठाला काँग्रेस इमानदार आणि सुसंस्कृत होती अशी नवीन उपरती झाली. तसेच, विरोधकांच्या पत्रावर शरद पवार गटाच्या कोणाचीही सही नव्हती. त्यांच्या गटाची सही नाही, याचा कोणताही वेगळा अर्थ मला काढायचे नसल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या एकीवर प्रश्नचिन्ह लावले. नागपुरात अधिवेशन सकाळी लवकर सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत चालते, त्यामुळे कामकाजाचे तास कमी होणार नाहीत. या अधिवेशनात 18 विधेयके मांडली जाणार असून, त्यातील काही छोटी आणि अनुषंगिक आहेत. लोकपाल विधेयकात केंद्राने एक सुधारणा सुचवली आहे, ज्यात केंद्राचे अधिकारी वगळण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
फडणवीस म्हणाले, 2014 नंतर विदर्भात मोठे बदल झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सिंचन, रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा झाली आहे. विरोधकांना सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, सभापती यांसारख्या संवैधानिक संस्थांचा आदर नसल्यामुळे ते नेरेटिव्ह पसरवण्याचे काम करीत आहेत. तसेच, योग्य आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. त्यासाठी प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. समितीच्या शिफारशींनुसार धोरण तयार करू आणि पात्र शेतकऱ्यांना लाभ देऊ. अतिवृष्टीग्रस्तांपैकी 92 टक्के शेतकऱ्यांना म्हणजेच जवळपास 90 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. उर्वरित 8 टक्के शेतकऱ्यांच्या केवायसीचा प्रश्न सोडवला जात आहे. 10 हजार रुपयांची अतिरिक्त मदतही पूर्णपणे दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेतेपदाबाबत दुराग्रह नाही
विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सदनांत विरोधी पक्षनेता नेमण्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षनेता नेमण्याचा अधिकार हा पूर्णपणे सभापती आणि अध्यक्षांचा असतो. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल,असे फडणवीस म्हणाले. तर, जनतेनेच त्यांना झिडकारले म्हणून विरोधी पक्षनेता बनविण्याइतकेही संख्याबळ विरोधक प्राप्त करू शकले नाहीत, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. त्यामुळे स्वतःच्या पदांची मागणी करण्यापेक्षा विरोधकांनी जनतेच्या प्रश्नांवर बोलावे. पुढच्या वेळी किमान विरोधी पक्षनेते पद मिळावे इतके संख्याबळ तरी विरोधकांनी कमवावे. त्याला आमचा विरोध नसल्याचा टोला शिंदे यांनी लगावला.
अजित पवारांच्या अनुपस्थितीचा केला खुलासा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय यांचे बहारिन येथे लग्न होते. मुख्यमंत्री म्हणाले की, अजित पवार हे बहारिनला होते आणि ते आताच पुण्यात उतरले आहेत. विमानसेवेचा जो गोंधळ झाला आहे त्यामुळेही त्यांना पुण्यात पोहोचण्यास उशीर झाला. मात्र, ते रात्री उशिरा नागपूरला येण्यास निघालेदेखील आहेत. सोमवारपासून ते पूर्णवेळ उपस्थित असतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
उद्धव ठाकरे इंडिगोच्या विमानाने फिरत नाहीत
उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनात केवळ दोनच दिवस येणार आहेत. त्यांना येण्यास अडचण आहे का, या प्रश्नावर उद्धव ठाकरे हे इंडिगोच्या विमानाने फिरत नाहीत. ते ज्या विशेष विमानाने फिरतात त्या विमानाला अडचण नाही. बाकी कोणाला अडचण असेल तर समृद्धी महामार्ग आहेच. त्यावरून आठ तासांत येता येईल, हवे असेल तर गाडी पाठवून देतो, असा मिश्कील टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.