

नागपूर : एकिकडे नक्षलवाद कमी होत असताना आता 'शहरी नक्षलवाद' हे सर्वात मोठे आव्हान समोर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (दि.२३) स्पष्ट केले. ते कोण आहेत, हे समजायला वेळ लागतो, अशी नवी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तरुणांच्या मनात 'संविधान मार्गाने तुम्हाला न्याय मिळू शकत नाही' असे काही व्यक्तींकडून पेरले जाते, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
पुढे बोलताना ते म्हणाले, जंगलातील नक्षलवादी कोण आहेत, हे आम्हाला माहीत होते. पण आता शहरी नक्षलवादाबद्दल बोलायचं झालं तर शत्रू कोण हे माहीत नाही. तो समजायला वेळ लागेल. आपण संविधानाच्या मार्गाने जात संविधान रुजविण्याचा प्रयत्न केला तर त्याचे उत्तर देऊ शकू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महानगरपालिका निवडणुकीबद्दल बोलताना ते म्हणाले, आगामी मनपा निवडणुकीत महायुतीसाठी फायद्याचे असेल तिथे युती करू, अन्यथा नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पहिल्या तर अजितदादा गट दुसऱ्या क्रमांकावर राहील. मुंबईतही युती करणार आहोत. स्थानिक राजकारण पाहून काही ठिकाणी प्रिपोल (निवडणुकीपूर्वी) तर काही ठिकाणी पोस्ट पोल (निवडणुकीनंतर) युतीचे निर्णय होतील. नागपूर पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार लवकरच ठरेल. जो चांगल्या प्रकारे काम करेल पक्ष त्याच्या पाठीशी राहील, असे सांगत त्यांनी सुधाकर कोहळे यांच्या कामाचे संकेत दिले. MPDA अंतर्गत एकाचवेळी ५० गुन्हेगारांना सोडण्याचा न्यायालयाचा आदेश योग्य वाटला नाही. आम्ही त्या विरोधात न्याय मागणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.