

नागपूर : जागतिक बँकेच्या अहवालानुसार पुढील दहा वर्षांत नागपूर शहराचा वेगाने विकास होणार असून पायाभूत सुविधांमुळे शहराची नवी ओळख निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या सुनियोजित विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महानगरपालिकेच्या हिरवळीवर आयोजित विशेष समारंभात ४७६ सफाई कामगारांना कायम नियुक्तीपत्रे तसेच सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेल्या १०३ युवकांना नियुक्तीपत्रांचे वितरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात 'आपली बस'साठी व्हॉट्सॲप तिकीट प्रणालीचाही शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते.
यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे, आमदार मोहन मते व कृष्णा खोपडे, उपमहापौर लिलाताई हाथीबेड, राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंह डागोर, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी, महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त मुरगनाथन एम., अंकित यांच्यासह विविध समित्यांचे सभापती, पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यात स्वच्छतादूतांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेला प्राधान्य देत आस्थापना खर्चावरील निर्बंध शिथिल करून मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात आली आहे. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार ४७६ स्वच्छतादूतांना कायम नियुक्ती देण्यात आली असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेले त्यांच्या सेवाविषयक प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत.
स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नागपूर महानगरपालिकेने राज्यात प्रथमच मोफत घरकुल योजना सुरू केल्याचे सांगत त्यांनी सांगितले की, ३०० चौरस फुटांचे मोफत घर देण्यात येणार असून, अतिरिक्त शुल्क भरून अधिक मोठे घर घेण्याचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्यासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागपूरच्या झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज वाढणार आहे. त्यामुळे सफाई कामगारांच्या पाल्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महानगरपालिकेला केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, शहराच्या विकासाबरोबरच स्वच्छता, खेळाची मैदाने आणि नागरिकांसाठी मूलभूत सुविधा यांनाही समान प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्येक प्रभागात खेळाची मैदाने, २४ तास पाणीपुरवठा आणि बेरोजगार युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी 'आपली बस'साठी व्हॉट्सॲपद्वारे तिकीट सेवा सुरू झाल्याने शहराच्या स्मार्ट वाहतूक व्यवस्थेला चालना मिळेल, असे सांगत स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना ही त्यांच्यासाठी मोठी दिलासादायक योजना ठरेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.