

World Records Book of India
नागपूर : ‘वर्ल्ड एग डे २०२५’ च्या निमित्ताने प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ५००१ अंड्यांची भुर्जी तयार केली. ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया’मध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू), नागपूर अंतर्गत नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या कुक्कुट पालन शास्त्र विभागाने प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या सहकार्याने रविवारी (दि.१२) हा एक आगळावेगळा उपक्रम राबवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. अंड्यांबद्दल असलेले गैरसमज दूर करून, समाजात त्यांच्या पौष्टिक मूल्यांविषयी जनजागृती करणे आणि प्रथिनयुक्त, आरोग्यदायी आहाराचा प्रसार करणे, या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
रविवारी पहाटे साडेपाच वाजता सेमीनरी हिल्स परिसरातील नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या आवारात या उपक्रमाचे हवेत फुगे सोडून उद्घाटन करण्यात आले. भुर्जी तयार करण्याची प्रक्रिया सुमारे नऊ वाजेपर्यंत चालली. त्यानंतर उपस्थित मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिकांना भुर्जी पावासह नि:शुल्क वितरीत करण्यात आली. हजारोच्या संख्येने जमलेले नागरिक यावेळी भुर्जीची चव घेत विश्वविक्रमाचे साक्षीदार झाले. योजना पोल्ट्री, पुणे यांच्याकडून “पॉवर एग” या ब्रँडची अंडी तर साई केटरर्स, नागपूर यांच्याकडून पाव उपलब्ध करून देण्यात आले.
महाचाय प्रा. लि. तर्फे सर्व उपस्थितांना चहाचे वितरण करण्यात आले. ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया’चे अॅडज्युरीकेटर डॉ. धीरज अग्रवाल आणि डॉ. हर्षल वऱ्हाडे उपस्थित होते. त्यांच्या पुष्टीकरणानंतर राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या हस्ते वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले.यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, वेनकीज इंडियाचे जनरल मॅनेजर डॉ. विजय तिजारे, संचालक शिक्षण व अधिष्ठाता डॉ. एस. व्ही. उपाध्ये, संचालक विस्तार शिक्षण डॉ. एस. डब्ल्यू. बोंडे उपस्थित होते. पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जयंत कोरडे, समन्वयक डॉ. मुकुंद कदम यांनी पुढाकार घेतला.