

नागपूर : प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आज एका अफलातून उपक्रमाला सुरुवात केली. रविवारी सकाळी आठ पासून उद्या सोमवारपर्यंत ‘न थांबता 24 तास डोसे बनविणे’ आणि ‘24 तासात जास्तीत जास्त डोसे बनविणे’ अशा दोन विश्वविक्रमांना ते गवसणी घालणार आहेत. अर्थातच नागपूरकरांनी चटणीसह या डोस्यांची चव घेण्यासाठी बजाज नगर येथील विष्णू जी की रसोई मध्ये मोठी गर्दी केली आहे.
रविवारचा दिवस असल्याने खवय्यांसाठी एक पर्वणीच म्हणता येईल. प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्वावर ‘एकास एक’ याप्रमाणे डोसे वितरीत केले जात आहेत. यासोबतच हिंदी-मराठी गाणी, गझल, भजन, एकपात्री प्रयोग, स्टँडअप कॉमेडी असे मनोरंजन सुरू राहणार आहे.
पहिल्या दोन तासात 758 डोसे तयार झाले यानुसार साधारणपणे 5 ते 6 हजार डोसे तयार होतील असा अंदाज विष्णू मनोहर यांनी व्यक्त केला. या उपक्रमाची सांगता‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाने होणार आहे. हा संपूर्ण उपक्रम श्रीमती स्मिता लक्ष्मण गडीकर यांना समर्पितआहे. अंधविद्यालय, स्पेशल मुलांच्या शाळा, तृतीयपंथियांचा संघ, अनाथाश्रम, मुकबधीर विद्यालय, वृद्धाश्रम आदी संस्थांना देखील डोसे वितरीत केले जाणार आहेत.