

Chandrashekhar Bawankule on Banjara Reservation
नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या सूचनांनुसार राज्यात अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून केंद्र व राज्य सरकारच्या नियमांनुसार शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई दिली जाणार आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. बंजारा आरक्षणात कोणत्याही समाजाची नोंद घ्यायची असल्यास प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा लागतो. या मागणीवर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
ईव्हीएमवर शरद पवार यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, निवडणूक आयोगाने यापूर्वी त्यांना नोटीस दिली होती. त्यावेळी कोणी आक्षेप नोंदवला नव्हता. मेळाव्याच्या माध्यमातून फक्त कार्यकर्त्यांना स्थिर ठेवण्यासाठीच त्यांनी ईव्हीएमचा प्रयोग केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मोर्चा काढण्याचेच काम आहे, आम्ही मात्र शेतकऱ्याला न्याय देतो.
शेतकऱ्यांना योग्य मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणे मिळेल. संपादनाच्या वेळी शेतकऱ्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मी स्वतः भूसंपादन मंत्री आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अन्याय शेतकऱ्यांवर होणार नाही. दरम्यान, कॅबिनेटने तिसरा रिंग रोड मंजूर केला असून एनएमआरडीएमार्फत त्याचे काम करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.