

नागपूर : एकीकडे महाविकास आघाडीसोबत आले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांना थेट राज्याचे मुख्यमंत्री करू, काँग्रेस तुमच्यासोबत राहील, अशी ऑफर देणारे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लवकरच लक्षात येईल. काँग्रेसला आगामी दहा-पंधरा वर्षे राज्यात काहीही संधी नाही, असा चिमटा भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला. यासोबतच आपली कुठलीही ऑफर पटोले यांना नसल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसमध्येच राहावे, असा सबुरीचा सल्ला देखील बावनकुळे यांनी पटोले यांना दिला.
कोराडी येथील निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांसोबत धुळवडीच्या निमित्ताने ते शुक्रवारी (दि.१४) माध्यमांशी बोलत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात आले, त्यांचे नक्कीच स्वागत आहे. याच पद्धतीने त्यांनी वारंवार सभागृहात यावे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सकाळचा भोंगा, शिमगा बंद करावा, कारण आता दहा-पंधरा वर्ष काँग्रेसला राज्यात संधी नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांनी काम केले. आता त्यांना विरोधक म्हणून राज्यातील जनतेने जनमताचा कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनी आता सभागृहात येऊन राज्याच्या विकासाचे राजकारण करावे. आम्हाला मार्गदर्शन करावे, असा सबुरीचा सल्ला देखील त्यांनी यानिमित्ताने दिला. बावनकुळे यांनी संजय राऊत यांना देखील याच प्रकारे सबुरीचा सल्ला देत त्यांनी आता उगीच आरोप, प्रत्यारोपांचा शिमगा करण्यापेक्षा विकासाच्या बाबतीत बोलावे, असेही सांगितले.