

नागपूर: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसकडून मतदारयाद्यांमध्ये बोगस नावे असल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला थेट आव्हान दिले आहे. "ज्या याद्यांवर विधानसभा निवडणुका झाल्या, त्याच याद्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे काँग्रेसने आक्षेप आताच नोंदवावेत आणि पराभवानंतर मतदारयाद्यांवर खापर फोडू नये," असे त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीवेळी राज्यभरात मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्या होत्या, पण तेव्हा काँग्रेसने कोणताही आक्षेप घेतला नाही. आता पराभवानंतर सात महिन्यांनी राहुल गांधी आरोप करत आहेत. ज्यावेळी काँग्रेसचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा याच मतदारयाद्या त्यांना योग्य वाटत होत्या. जिथे भाजप जिंकते, तिथेच काँग्रेसला आक्षेप असतो," असा टोला त्यांनी लगावला.
मतदारवाढीचे समर्थन करताना ते म्हणाले, "आम्हाला आमच्या अडीच लाख लाडक्या बहिणींनी आणि ४५ लाख शेतकऱ्यांनी मतदान केले आहे. माझ्या कामठी मतदारसंघात आम्ही विशेष नोंदणी अभियान राबवून ३४ हजार नवीन मतदार नोंदवले. मतदार वाढणे म्हणजे यादी चुकीची असणे नव्हे." त्यांनी राहुल गांधींना आवाहन केले की, त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावून आगामी निवडणुकांपूर्वी मतदारयाद्या तपासून घ्याव्यात.