विदर्भात महायुतीची आघाडी, 'मविआ'त बिघाडी!

Maharashtra Assembly Election : इच्छुक आणि समर्थकांमध्येही तळ्यात-मळ्यात
Maharashtra Assembly Election
विदर्भात महाविकास आघाडीत मात्र काही जागांवरून बिघाडी कायम आहे.
Published on
Updated on
राजेंद्र उट्टलवार

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भात महायुतीच्या भाजप -शिंदे शिवसेनेने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतलेली असताना महाविकास आघाडीत मात्र काही जागांवरून बिघाडी कायम आहे. इच्छुक आणि समर्थकांमध्येही तळ्यात मळ्यात सुरू आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूने बंडखोरीची चिन्हे आहेत. अनेकांसाठी ही शेवटची निवडणूक असल्याने ते माघार घेण्यास तयार नाहीत. (Maharashtra Assembly Election )

Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly Election | ठाणे जिल्ह्यातील 71 लाख मतदार निवडणार 18 आमदार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, रणधीर सावरकर अशी विदर्भातील महत्त्वाची नावे असलेले पहिली यादी जाहीर झाली. 24 ते 28 ऑक्टोंबर दरम्यान नामांकन अर्ज भरण्याचे कार्यक्रमही जाहीर झाले. दुसरीकडे महाविकास आघाडीची यादी मात्र अद्यापही वेट अँड वॉच अशीच आहे. एक प्रकारे भाजपने आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करीत सत्तेच्या दृष्टीने महत्त्वाच्या विदर्भात पुढचे पाऊल टाकले आहे.

या यादीत 23 विद्यमान आमदारांना संधी, एकेक जागा महत्त्वाची असल्याने विनिंग मेरिटला प्राधान्य दिले आहे. नागपूर शहर व जिल्ह्यातील सहा जागा जाहीर झाल्या असताना उर्वरित सहा जागांवर उमेदवार बदलाचे संकेत आहेत. मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा दक्षिण पश्चिम नागपुरातून नशीब अजमावणार आहेत. गेल्यावेळी 49 हजारावर मतांनी विजय मिळवला असताना यावेळी 75 हजारांचे किमान लक्ष आहे. प्रतिस्पर्धी ठरायचे असताना कामठी मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रपूर जिल्ह्यात परंपरागत बल्लारपूर मतदारसंघातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ,डॉ पंकज भोयर वर्धा, समीर कुणावर हिंगणघाट तर रणधीर सावरकर अकोला पूर्व या मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत.

नागपुरातील सहा जागांपैकी पूर्व नागपूर मतदार संघातून हॅटट्रिक करणारे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे तर दक्षिण नागपुरातून मोहन मते आणि हिंगणा मतदारसंघात समीर मेघे यांनाच भाजपने पुन्हा एकदा संधी दिली. शहर व जिल्ह्यातील 12 पैकी 5 उमेदवार आणि रामटेकला शिवसेना शिंदे गटाचे आशिष जैस्वाल असे 6 उमेदवार आतापर्यंत जाहीर झाले आहेत. गेल्यावेळी जिल्ह्यात 12 पैकी 4 जागा भाजपकडे होत्या. महायुतीची काटोल, उमरेड, सावनेर, पश्चिम, मध्य आणि उत्तर या सहा जागांवरील उमेदवारी अजून जाहीर व्हायची आहे. विदर्भाच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा प्रचारातील सहभाग कसा राहणार, यावरही बरेच राजकारण अवलंबून असणार आहे. त्यामुळेच स्वतः फडणवीस बावनकुळे यांनी त्यांची यादी जाहीर होण्यापूर्वी भेट घेतली अर्थातच दुसरी तिसरी यादी लवकरच येणार असताना पहिल्या यादीवर मात्र फडणवीस यांचा वरचष्मा कायम आहे.

दरम्यान,महाविकास आघाडीत मात्र अजूनही उमेदवारी यादी अभावी इच्छुकांची , समर्थकांची घालमेल सुरूच आहे. विदर्भातील किमान 10 जागांबाबत मविआच्या तिन्ही पक्षांचे त्रांगडे सुरू आहे. दबावतंत्र म्हणून विद्यमान काही आमदारांची नावे उद्या रात्री काँग्रेस हायकमांडमार्फत जाहीर होण्याची शक्यता आहे.

तुटेपर्यंत ताणू नका, या शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मातोश्रीवर भेटीगाठी वाढल्या. काँग्रेसला विदर्भात पाठबळ मिळाल्यास मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले नाना पटोले यांची मात्र काहीशी कोंडी करण्याचा प्रयत्न सिल्वर ओक आणि मातोश्रीवरून झाल्याचेही पहायला मिळाले. विदर्भातील नेते दिल्लीत तर काही राज्यातील नेते हा गुंता सोडवण्याचा मुंबईत प्रयत्न करत आहेत. ज्या मतदारसंघात एकापेक्षा अधिक दावेदार किंवा ज्या उमेदवाराबाबत अडचण नाही अशा विद्यमान आमदारांचा पहिल्या यादीत समावेश असणार आहे. महाविकास आघाडीत मुंबईत शिवसेना उबाठा गट तर विदर्भातील 62 पैकी बहुतांश जागा काँग्रेस लढण्यावर एकमत झालेले असताना रामटेक, राजुरा, दक्षिण, मध्य नागपूरवरून शिवसेना आग्रही आहे तर जिल्ह्यात काटोल, हिंगणा आणि शहरात किमान पूर्व नागपूर आम्हाला द्या, किती वर्ष आम्ही काँग्रेसच्या सतरंज्या उचलायच्या ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष दूनेश्र्वर पेठे यांनी केला आहे.

थोडक्यात, दोन्ही बाजूने दबाव तंत्र वापरले जात आहे.सामूहिक राजीनामे तयार असून सांगली पॅटर्नचा इशारा दिला गेला आहे. शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे शहरातील सहाही जागा काँग्रेसचं लढेल, यावर ठाम आहे तर माजी मंत्री सुनील केदार ग्रामीणच्या सहा जागांचा हट्ट सोडायला तयार नाहीत. महायुतीत राष्ट्रवादी ग्रामीण अध्यक्ष बाबा गुजर,शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी तूर्तास आपल्या तलवारी म्यान करून ठेवलेल्या आहेत.

काँग्रेसच्या पहिल्या संभाव्य यादीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (साकोली), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (ब्रह्मपुरी), ऍड यशोमती ठाकूर (तिवसा), डॉ नितीन राऊत( उत्तर नागपूर),वीरेंद्र जगताप( धामणगाव), आमदार विकास ठाकरे (पश्चिम नागपूर) डॉ सुनील देशमुख (अमरावती), रणजीत कांबळे (वर्धा -देवळी),अमित झनक, बंटी शेळके मध्य नागपूर यांचा प्रामुख्याने समावेश असण्याची शक्यता आहे. मात्र, एकीकडे महायुतीची तोवर दुसरी यादी आलेली असण्याची शक्यता लक्षात घेता महाविकास आघाडी पाहिल्या यादीवरच अडकून असल्याने लोकसभेला मिळालेले यश टिकवण्यात ते कितपत यशस्वी ठरणार हा प्रश्नच आहे. महायुती लाडकी बहीण व इतर योजनेमुळे तूर्तास कमबॅक करताना विदर्भात दिसत आहे. महागाई , शेतकऱ्यांची उपेक्षा आणि लोकशाही, संविधान रक्षण हे विरोधकांचे मुद्दे असणार आहेत. (Maharashtra Assembly Election )

Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly Polls: महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता येईल - चंद्रकांत पाटील

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news