

नागपूर : स्थानिक गणेशपेठ परिसरातील हॉटेल द्वारकामाई येथे बॉम्ब असल्याच्या धमकीचा ईमेल आल्यानंतर काही काळ परिसरात तारांबळ उडाली. जवळच मध्यवर्ती बस स्थानक तसेच खाजगी ट्रॅव्हल्स बस स्थानक असल्याने हा वर्दळीचा परिसर आहे. Bomb threat In Nagpur
गणेश पेठ पोलीस, अग्निशमन विभाग तसेच बॉम्बनाशकशोधक पथक, श्वान पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. बराच वेळ सखोल चौकशीअंती ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हॉटेल द्वारकामाईच्या व्यवस्थापनाला एक ईमेल आला यात साडेनऊच्या सुमारास हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आली. तातडीने व्यवस्थापनाने या विषयाची माहिती गणेशपेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी हॉटेलमधील वास्तव्यास असलेले पाहुणे तसेच स्टाफला खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर काढले. बराच वेळ हॉटेलची कसून चौकशी सुरू होती. माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. मात्र ही अफवा असल्याचे कळताच सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला.