

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे निर्देश आज (दि.६) देताच मुंबई, नागपूर अशा विविध महापालिका, जिल्हा परिषदमधील प्रशासकराज संपून नवे पदाधिकारी राज येण्याची संधी निर्माण झाली आहे.
लोकसभेला मविआला आघाडी तर विधानसभेला महायुतीला घवघवीत यश मिळाल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तेत राहण्यासाठी महायुतीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. नागपूर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपचाच झेंडा फडकणार असा विश्वास शहर भाजप अध्यक्ष बंटी कुकडे यांनी व्यक्त केला. तर महायुतीकडून जनतेचा भ्रमनिरास झाल्याने काँग्रेस आघाडीची सत्ता येईल, असा दावा शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या महानगरपालिकेच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याच्या आदेशावर नागपूर भाजपचे अध्यक्ष जितेंद्र उर्फ बंटी कुकडे म्हणाले, भाजप नेहमीच कार्यकर्त्यांच्या बाजूने आहे. लोकांच्या समस्या आणि निवडणुकांसाठी नेहमीच तयार आहे. आमचे संघटन मजबूत असल्याने विधानसभेप्रमाणेच ही निवडणूक देखील निश्चितच जिंकू, असेही ते म्हणाले.