

Ashish Deshmukh controversy statement
नागपूर : गेल्या आठवड्यात आपल्या मर्जीविरुद्ध भाजपात दोघांना प्रवेश दिल्याच्या कारणावरून महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापुढे उपोषणाचा अहिंसात्मक मार्ग पुकारणारे सावनेरचे भाजप आमदार डॉ आशिष देशमुख यांनी कळमेश्वरच्या सभेत मात्र मुख्यमंत्री, गृहमंत्री फडणवीस नागपूरचे आहेत. वळवळ कराल तर कापून काढू..! असा इशारा विरोधकांना दिल्याने जिल्ह्यातील राजकारण तापले आहे.
शेवटी कुठलाही पक्षात काही दिवस गेल्यावर आशिष देशमुख यांना राग का येतो ? याची चर्चा सुरू झाली आहे. हा व्हिडिओ नगर परिषद निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. भाजपातून काँग्रेस , काँग्रेसमधून भाजपात असा प्रवास करणारे आशिष देशमुख असे का बोलून गेले. दोन दिवसापूर्वी त्यांनी थेट राज्याचे महसूल मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अंगावर घेतले.
जे रेती माफिया राज्याचा महसूल बुडवितात त्यांना महसूलमंत्री सोबत घेऊन बसतात, असा आरोप करीत त्यांनी दोन दिवसात हे पक्ष प्रवेश रद्द न झाल्यास आपण सावनेरमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर करून टाकले होते. कधी वेगळ्या विदर्भाच्या नावावर त्यांनी तरूणांना आशा दाखविली. मग भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविली.
आता काँग्रेस सोडल्यावर देखील भाजपात त्यांना महात्मा गांधी यांचाच सत्याचा, अहिंसेचा मार्ग खरा असल्याची उपरती झाली. आता मुख्यमंत्री फडणवीस यांची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांनी ही महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत विरोधकांना थेट दिलेली धमकी, वापरलेली हिंसेची भाषा नक्कीच लोकशाहीत समर्थनीय नसून त्यांच्या समर्थकांची चिंता वाढविणारी अशीच म्हणता येईल.