

नागपूर : औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात मोठा वाद सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. राजकीय वातावरणसुद्धा तापले आहे. नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने कबरीच्या विरोधात आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिवेशनात कबरीचा विषय सध्या प्रासंगिक नाही, अशी भूमिका घेऊन हिंदू संघटनांना सबुरीचा सल्ला दिला होता.
आता संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी हा वादच अनावश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. हे बघता भाजपलाही आता या विषयावर जहाल मते मांडणाऱ्या आपल्या नेत्यांना आवरावे लागणार असल्याचे दिसून येते. नागपूरमध्ये दंगल उसळल्यानंतर संघाने यावर आपली अधिकृत भूमिका जाहीर केली होती. कबरीवरून वाद संयुक्तिक नाही आणि आम्ही याचे समर्थन करीत नसल्याचे सांगून संघाने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनाला आवर घालण्यात आला होता. त्यानंतरही कबरीवर राजकारण सुरूच होते. विश्व हिंदू परिषदेने कबर हटवल्याशिवय शांत बसणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी कबरीला बाबरी मशिदीच्या आंदोलनाशी जोडून भविष्यात होणाऱ्या घटनेकडे लक्ष वेधले होते. मात्र भय्याजी जोशी यांनी मात्र या सर्व चर्चांना विराम दिला आहे. ते म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीचा विषयच अनावश्यक आहे. त्याचा इथेच मृत्यू झाल्याने कबर बांधण्यात आली. हे भारताच्या उदारतेचे आणि सर्वसमावेशकतेचे प्रतिक आहे. आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगेजाबाच्या कबरीला कायद्यानुसार संरक्षण देण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्याचे सांगितले. मात्र औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला आहे. या घडामोडी आणि संघाने जाहीर केलेली भूमिका बघता आता औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण करायचे नाही, असे ठरले असल्याचे दिसून येते.