

नागपूर: पायाभूत सुविधा समितीच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत आम्ही सर्व उपस्थित होतो. नेहमीप्रमाणे दादांचा आत्मविश्वास, मिश्कीलपण आणि कामावरील पकड तशीच होती. कोणालाही कल्पना नव्हती की ती भेट शेवटची ठरणार आहे; या शब्दात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आजही दादांच्या नसण्याची कल्पना मनाला मान्य होत नाही. क्षणोक्षणी वाटत राहते आता दादांचा फोन येईल, एखाद्या मुद्द्यावर ठाम शब्दांत चर्चा करतील, नेहमीसारखं हसत म्हणतील, “चला, कामाला लागूया.”दादा…
आपली ही धक्कादायक एक्झिट आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी अखंड झटणारा, निर्णयक्षम नेतृत्वाचा आधार अचानक हरपल्याची पोकळी शब्दांत मांडता येणार नाही. तुमची आठवण नेहमी येईल, तुमची उणीव नेहमी जाणवत राहील. अजितदादांचा प्रशासनातील अनुभव अतिशय समृद्ध होता. अनेकदा मी स्वतः त्यांच्याकडून सल्ला घेत असे, विविध विषयांवर त्यांच्याशी हक्काने चर्चा करीत असे. महायुतीत कार्य करत असताना अनेक प्रश्नांवर मोकळेपणाने संवाद साधण्याची त्यांची शैली मला नेहमी प्रेरणा देणारी वाटली. त्यांच्या सहवासातून मी स्वतः अनेक गोष्टी शिकलो. देशाने एक दूरदृष्टीसंपन्न नेता गमावला असेही बावनकुळे म्हणाले.