

नागपूर - महायुतीतील मित्र पक्षांमध्ये निवडणूक लढवताना मनभेद व मतभेद होऊ नयेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी आधीच ठरवले आहे. मित्र पक्ष म्हणून विरोधात लढलो तरी महायुतीत कोणतेही मतभेद होणार नाहीत, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असा सबुरीचा सल्ला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आज माध्यमांशी बोलताना दिला.
उमेदवारी माघारीसाठी कुणावरही दबाव नाही, महापालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विकासाच्या मुद्द्यावर बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले. हा चांगला पायंडा आहे. महाराष्ट्र हे प्रगल्भ राज्य असून कुणावरही दबाव टाकून उमेदवारी मागे घेतली जात नाही असा दावा केला. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, त्यांच्या मुलाखतींसाठी आधीच नोट्स तयार असतात. केवळ मीडियासमोर येण्यासाठी हा सारा प्रपंच केला जातो. सर्व माध्यमांमधून एकाच वेळी हे झाले तर बरे होईल.
सोलापूर येथील हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, गुन्हा करणारा भाजपचा असो किंवा काँग्रेसचा, पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे. याशिवाय चंद्रपूरमधील वादावर बावनकुळे म्हणाले की, भाजपचा कार्यकर्ता कुठेही वाद करणार नाहीत. जिथे चुकीचे घडले तिथे कारवाई करण्यात आली असून जिल्हाध्यक्षांना हटवण्यात आले आहे. तिकिटांचा विषय आता संपला असून पक्ष निवडणूक मोडमध्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गडचिरोलीतील बाळ आणि माता मृत्यूच्या घटनेवर दुःख व्यक्त करत, ही अत्यंत दुर्दैवी घटना असून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून नेमकी माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक प्रचाराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सर्व प्रकारच्या प्रचार माध्यमांचा वापर करणार असून रोड शोद्वारे मोठ्या प्रमाणावर जनतेपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे. नागपूरमधील बंडखोरीच्या मुद्द्यावर, शेवटपर्यंत सर्वांना समजावून घेऊन समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल,असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.