

Chakka Jam Butibori Nagpur
नागपूर: वर्धा रोडवर दिव्यांग बांधवांनी मंगळवारी (दि.२८) सायंकाळी ठिय्या आंदोलन केल्याने वातावरण तापले. अनेक शेतकरी नेते एकत्र आल्याने आता सरकारपुढे झुकायचे नाही. जनशक्ती रस्त्यावर उतरली. तर नेपाळची पुनरावृत्ती होते. राज्यात आमदार, मंत्री पळता भुई थोडी करा, असा निर्वाणीचा इशारा नेत्यांकडून दिला गेला.
या निमित्ताने हैदराबाद, अमरावती, जबलपूर महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. बुटीबोरी मुख्य चौकात वाहतुकीचा फज्जा उडाला. पोलिसांची बघ्याची भूमिका दिसली. राज्यातील शेतकरी बांधवाना संपूर्ण कर्जमुक्ती देऊ असे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजप महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला नसल्याने शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील 'प्रहार' जनशक्ती संघटनेच्या भव्य शेतकरी मोर्चाने आज बुटीबोरीच्या मुख्य चौकात चक्का जाम केला.
राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. पोलिस प्रशासन केवळ 'बघ्याची भूमिका' घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. "सातबारा कोरा झालाच पाहिजे!", "शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो!" अशा घोषणांनी महामार्ग दणाणला होता. पोलिस निरीक्षकांसमोरच आंदोलकांनी टँकर अडवले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरकारला दिलेला वेळ संपल्यानंतर सर्वजण सभास्थळ परसोडीच्या दिशेने रवाना झाले.
यावेळी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष व शेतकरी नेते बच्चू कडू, राजू शेट्टी, माजी मंत्री अनिल देशमुख, रविकांत तुपकर, विजय जावंधिया, महादेव जानकर, शेतकरी नेते प्रकाश पोहरे, अखिल भारतीय किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण लाटकर, जिल्हा सचिव अशोक आत्राम, आदिवासी अधिकार मंच जिल्हा संयोजक अमोल धुर्वे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी प्रदेश महासचिव मुजीब पठाण यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.