

नागपूर : राष्ट्रीय आपत्तीमुळे पक्ष-विपक्ष विसरून सर्वजण एकत्र आलो. पण ज्यावेळी पाकिस्तानने युद्ध थांबविण्याची विनंती केली. त्यावेळी ज्यांनी संसदेसह इतर ठिकाणावर हल्ले केले, अशा लोकांचे प्रत्यार्पण पाकिस्तानकडून का मागितले नाही? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला. भाजप सरकारने सर्व पक्षांची बैठक बोलवावी. त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित रहावे. यावेळी सेनेचे अभिनंदन करून या विषयावर चर्चा करावी, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात दिल्याशिवाय आम्ही युद्ध थांबवणार नाही, असे का ठणकावले नाही. भारताने ही संधी सोडल्याचे स्पष्ट दिसत आहे. पाकिस्तान आणि काश्मीरचा द्विपक्षीय प्रश्न आहे. यात तिसऱ्याचा हस्तक्षेप आम्ही कधीच मान्य करणार नाही, असा स्पष्ट करार झाला आहे. ट्रम्प यांनी धमकी दिली, तुम्ही युद्ध थांबवलं नाही तर मी तुमच्या सोबतचे व्यापार बंद करेन. या त्यांच्या धमकीला पंतप्रधानांनी रोखठोक उत्तर दिले असते तर चांगले झाले असते असेही ते यावेळी म्हणाले.