

नागपूर : बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी अशोक सिद्धार्थ व माजी प्रदेशाध्यक्ष तसेच छत्तीसगडचे प्रभारी संदीप ताजने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी अशोक सिद्धार्थ व राज्याचे माजी प्रभारी नितीन सिंह यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवल्याची घोषणा केली.
समाज माध्यमातून ही घोषणा केल्यानंतर ताजणे यांना देखील निलंबित केल्याचे प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांनी जाहीर केले. महिनाभरापूर्वी सिद्धार्थ यांच्या उपस्थितीत मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त जनकल्याण दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत या सर्वांची हकालपट्टी करण्यात आली आहे. संदीप ताजणे यांना रामजी गौतम यांना मारहाण प्रकरणानंतर पक्षातून काढले. त्यानंतर पुन्हा प्रदेश उपाध्यक्ष पद बहाल करण्यात आले होते. एकंदरीत बसपात गेल्या काही दिवसात प्रवेश, हकालपट्टी आणि पुन्हा प्रवेश, असे वातावरण असल्याने प्रदेश पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. कधीकाळी भाजप काँग्रेसनंतर बसपा हा कॅडरबेस मोठा पक्ष मानला जात होता. मात्र गेल्या काही वर्षात रिपब्लिकन पक्षापाठोपाठ बसपाची सातत्याने घसरण होत आहे.