

नागपूर : मागील अनेक वर्षात बाळू धोरणात सुधारणा केल्या तरी माफिया वेगवेगळ्या पद्धतीने त्याची पायमल्ली करतात. या संदर्भात सखोल अभ्यास करून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सकारात्मक भूमिकेतून निर्णय घेणार आहेत. घरकुलच्या लाभार्थ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू मिळावी, यासाठी प्रयत्न असल्याचे राज्यमंत्री अॅड. आशिष जैस्वाल यांनी मंगळवारी (दि.७) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
कोरोनानंतर सरकार अलर्ट मोडवर असून कुणी याचिका दाखल करो अथवा न करो, सरकार आवश्यक उपाययोजना आणि काळजी घेत असल्याचा दावा केला. वाघिणीला घेरण्याचा प्रयत्न ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. वन्य प्राण्यांना त्रास होऊ नये यासंदर्भात कठोर पावले उचलली जातील, असेही ते म्हणाले. दरम्यान, महायुती सरकारतर्फे लोकहिताचे निर्णय शंभर दिवसात घेतले जाणार आहेत, महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला अभिप्रेत निर्णय सर्व विभागाचे मंत्री घेत आहेत. शंभर दिवसात कुठले निर्णय कुठल्या विभागांनी घ्यावे, याचे टार्गेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.