

नागपूर : रक्षा खडसे यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्यांचा परिवार जर सुरक्षित राहणार नसेल तर सामान्य जनतेचे काय होणार? असा प्रश्न आहे. सामान्य जनता कशी सुरक्षित राहणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी (दि.३) पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. तसेच शक्ती कायदा लवकर करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
महादेव मुंडे यांच्या पत्नीने पतीच्या हत्येबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तरीही राज्य सरकार यावर संवेदनशील दिसत नाही. मंत्र्यांवर आरोप होत आहेत. किती दिवसापासून प्रश्न सुरू आहे. निर्णय राज्य सरकारला घ्यायचा आहे, पण अजून सरकार निर्णय घेताना दिसत नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, माजी मंत्री सुनील केदार यांच्याबाबत २४ तासात कारवाई होते. मात्र, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर शिक्षा ठोठावूनही कारवाई होत नाही. मुख्यमंत्री फडणवीस त्यांचा राजीनामा मागतील, असे मला वाटत नाही.
मी गृहमंत्री असताना शक्ती कायद्यांतर्गत बलात्काराच्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशा पद्धतीची तरतूद त्या कायद्यात होती. चार वर्ष लोटूनही केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात, तांत्रिक अडचणी आहेत. माझी मागणी आहे, तांत्रिक अडचणी असेल तर तज्ञ लोकांशी बोलून बदल करून कायदा करावा.