

Maharashtra Voter List Issues
नागपूर: मुंबईत महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा होत आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले, मतचोरी झाली. एका घरात 130 मतदार दाखवलेले आहेत. नवी मुंबई आणि मुंबई पोलिस आयुक्तांच्या घरांमध्येही अशाच पद्धतीने मतदार नोंदी दाखवल्या गेल्या. मतदार याद्यांमधील चुका प्रथम दुरुस्त कराव्यात, आणि त्यानंतरच निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केली.
कर्जमाफी संदर्भात अजित पवारांवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, आमचं सरकार आलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. मग आता तुमचंच सरकार आलंय. ते दिलेलं आश्वासन पूर्ण करा. शेतकरी अडचणीत आहे. सरकारने दिलेलं वचन आणि कर्जमाफीची जाहीर केलेली तारीख तरी पाळावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, महाविकास आघाडीत शिवसेना, मनसे, उद्धव ठाकरे गट असे सर्व पक्षांचे नेते सहभागी आहेत. एखाद्या नेत्याला काही वैयक्तिक काम असेल, तर ती वेगळी बाब आहे, परंतु आम्ही सोबत आहोत.