

नागपूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांना दिले होते. सरकार आल्यानंतर मात्र सत्ताधाऱ्यांना या आश्वासनाचा विसर पडलेला दिसतोय, शेवटी कर्जमाफीची आश्वासन हात चुनावी जुमला होता का, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी करीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
आज अजित दादा पवार यांनी मी माझ्या भाषणात कधीच कर्जमाफीचा उल्लेख केला नाही असे वक्तव्य केले. परंतु महायुतीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असा जाहीरनाम्यात भाजपाने स्पष्टपणे उल्लेख केला होता. आता सरकार म्हणून अजित पवार यांची सुद्धा जबाबदारी आहे की, शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे. दुष्काळ, अतिवृष्टी, पिकांना भाव नसल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. त्या बळीराजाला कर्जमुक्त करून आधार देण्याची नितांत आवश्यकता आहे. नुकतेच मी कर्जमाफीच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले आहे.