

Amit Shah on Congress healthcare
नागपूर : काँग्रेसचे नेते संस्कार नसल्याने काहीही बोलतात. मग मी बोललो तर त्यांना वाईट वाटते या शब्दात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 2014 साली माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात 37 हजार कोटी रुपये आरोग्य विषयक आर्थिक तरतूद बजेटमध्ये होती जी 2025 मध्ये मोदी सरकारच्या कार्यकाळात एक लाख 35 हजार कोटींवर पोहोचली असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
पाच लाख रुपये पर्यंतची 60 कोटी जनतेला मोफत उपचाराची सुविधा 70 वर्षांवरील जेष्ठांना मोफत उपचार अशा विविध योजनांचा आढावा त्यांनी त्या निमित्ताने घेतला. 2014 साली 7 एम्स देशात होते आता 23 एम्सना मंजुरी देण्यात आली याकडेही लक्ष वेधले. मात्र आज आरोग्याच्या वाढत्या समस्या लक्षात घेता सरकार एकट्याने आरोग्य यंत्रणा, आवश्यक सुविधा देऊ शकत नाही अशावेळी आबाजी थत्ते अनुसंधान संस्थान सारख्या चांगल्या संस्थांची गरज आहे. भविष्यात त्यांच्याकडून चालविले जाणारे नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट एनसीआर देशात सर्वात चांगले ठरेल या ठिकाणी संशोधनावर अधिक भर दिला जावा, यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही आमित शहा यांनी दिली.
वर्धा रोडवरील एनसीआय येथे कर्करुग्णांचे नातेवाईकांसाठी निवास व्यवस्था असलेल्या स्वस्ति निवास इमारतीचे भूमिपूजन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ऍड सुनील मनोहर, अजय संचेती, शैलेश जोगळेकर, आ समीर मेघे, आनंद औरंगाबादकर,आनंद पाठक, प्रसन्न मोहिले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपल्या कुटुंबात कर्करोगामुळे यातना भोगल्याने त्यापासून समाजाची मुक्ती करण्याच्या संकल्पातून हा प्रकल्प उभारल्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि शैलेश जोगळेकर यांची अमित शहा यांनी प्रशंसा केली. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन झाले तेव्हा मणिपूरमधील घटनेमुळे येऊ शकलो नसल्याची खंत व्यक्त केली. आबाजी थत्ते यांच्या नावाने हे कॅन्सर इस्टिट्यूट असून आपण तीन दिवस त्यांच्या सान्निध्यात असल्याची आठवण सांगितली. आज देशात मुख आणि सर्व्हॉयकल कॅन्सरचे वाढते रुग्ण चिंतेची बाब असून अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे उपचारही सुलभ झाल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयात कलम 370 हटविणे, देशभरात कुठेही आपत्ती व्यवस्थापनात पुढे असलेले देशाचे लोहपुरुष असा अमित शहा यांचा उल्लेख केला. मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यातून रुग्ण येतात. नातेवाईकांना निवारा म्हणून ही सुविधा उभी होईल.भविष्यात एनसीआय कर्करुग्णांसाठी देशात प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून नावारूपास येईल असा विश्वासही व्यक्त केला.