

नागपूर : राज्यात अस्मानी संकटामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, पण महायुती सरकारने आजवर मदतीचा एक रुपयाही दिलेला नाही. फक्त कोरड्या घोषणा करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी महाराष्ट्रात आले, तरी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकही शब्द उच्चारला नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सुद्धा गप्प बसले, हा शेतकऱ्यांचा अपमान आहे, असे ते म्हणाले.
नागलोक कामठी येथे आयोजित काँग्रेसच्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या सांगता कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सपकाळ बोलत होते. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, अद्याप कोणतीही ठोस मदत जाहीर न झाल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीने द्यावेत, रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे-खते पुरवावे आणि कर्जमाफी जाहीर करावी, अशी काँग्रेसची मागणी त्यांनी केली.
कार्यशाळेत शहरी राजकारण, बदलते राजकारण आणि जनसंपर्क यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी विजय वडेट्टीवार, डॉ. नितीन राऊत यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. शहरी भागात काँग्रेसची उभारणी करण्यासाठी कार्यकर्त्यांचे जाळे उभारणे, मतदारांशी नियमित संवाद ठेवणे आणि जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी उपाययोजना राबविणे, यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले.
या शिबिरात माजी महापौर, शहराध्यक्ष, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता. पक्षाच्या बळकटीसाठी विकेंद्रीकरणाची भूमिका स्पष्ट करत सपकाळ यांनी काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा निर्धार व्यक्त केला.