

नागपूर : नागपुरातील काटोल रोडवरील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी सुरू करण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वन मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र वन विकास महामंडळ (एफडीसीएम ) गोरेवाडा झू लिमिटेड, नागपूर आणि एनबीसीसी दरम्यान आफ्रिकन सफारी व सफारी प्लाझा कामासंदर्भात महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे सध्या वन्यप्राणी दर्शनासाठी लोकांच्या आवडीच्या या पार्कचे वैभवात भविष्यात अधिकच भर पडणार आहे.
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान, नागपूर येथे सद्यस्थितीत इंडीयन सफारीचे काम पूर्ण झाले असून २६ जानेवारी २०२१ रोजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते सदर प्राणी उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले आहे.
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय या प्रकल्पामध्ये दुस-या टप्यामध्ये आफ्रिकन सफारीचे काम प्रस्तावित होते. त्याअनुषंगाने आफ्रिकन सफारी, सफारी प्लाझा व इतर अनुषंगिक बाबींकरिता राज्य शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता.गोरेवाडा प्रकल्पातील टप्पा-२ आफ्रिकन सफारीचे बांधकाम नॅशनल बिल्डिंग कन्ट्रक्शन कार्पोरेशन मार्फत करण्यासाठी आज एनबीसीसी बरोबर हा करार करण्यात आला.