

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
नियमितपणे वडिलांना कामावर जाताना आवाज देत बाय - बाय करणाऱ्या चिमुकलीने आवाज दिला, पण तो आज शेवटचाच ठरला. तिसऱ्या माळ्यावरुन खाली पडून २ वर्षीय मुलीच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तीचा अंत झाला. हदय पिळवटून टाकणारी ही घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील योगी अरविंदनगर येथे घडली. नमस्वी प्रकाश मौदेकर (वय २) असे या चिमुकलीचे नाव आहे.
चालक असलेले प्रकाश यांना दोन मुले असून, नमस्वी ही लहान होती. सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास ते कामावर जायला निघाले. याचवेळी नेहमीप्रमाणे तिसऱ्या माळ्यावरील गॅलरीत नमस्वी आली. गॅलरीतील स्टीलच्या ग्रीलवर चढून तिने प्रकाश यांना आवाज दिला. याचदरम्यान तोल गेल्याने ती खाली पडली. गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाली. प्रकाश यांनी तिला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या दुर्देवी घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.