

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नागपूर येथून महाबोधी मंदिर, बोधगया येथे 800 ज्येष्ठ नागरिक विशेष रेल्वेने रवाना होत आहेत. दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.15 वाजता नागपूर येथील मुख्य रेल्वे स्टेशन येथून ही रेल्वे रवाना होणार असून शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखरबावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी दिली.
भगवान बुध्द यांनी इसवी सन पूर्व 521 मध्ये बोधगया येथे बोधी वृक्षाच्या खाली बसून संपूर्ण ज्ञान प्राप्त केले. सम्राट अशोक यांनी या ठिकाणी तीर्थयात्रेला आल्यानंतर मंदिराचे निर्माण केले. या पवित्र भूमीच्या तीर्थयात्रेसाठी भाविकांची विशेष ओढ असते. 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेचा लाभ घेता यावा यासाठी शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली आहे.