नागपूर ; पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी 2025 पासूनच्या शताब्दी वर्षात अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण वर्गात वर्तमान काळानुसार व्यवहार्य, धोरणात्मक बदल होत आहेत. नागपुरात होणाऱ्या 25 दिवसीय तृतीय वर्ष वर्गाचे नामकरण आता कार्यकर्ता विकास वर्ग असे होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा आज (शुक्रवार) पासून नागपुरात रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात सुरू झाली. या निमित्ताने सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी ही माहिती दिली. यावेळी अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर उपस्थित होते.
गेल्या वर्षभरात युवकांचा संघ प्रवेशाकडे वाढता कल लक्षात घेता या अभ्यास वर्गांची रचना बदलली जात आहे. यात संघ संघटन नवीन असलेल्या कार्यकर्त्यांसाठी तीन दिवसांचा प्रारंभिक वर्ग होणार आहे. यानंतर प्रथम वर्षाच्या ऐवजी 15 दिवसांचा संघ शिक्षा वर्ग, द्वितीय वर्ष झोननिहाय कार्यकर्ता होणार असून, कार्यकर्ता विकास वर्ग असे त्याचे स्वरूप राहील. या शिवाय 13 मे पासून नागपुरात सुरू होणारा 25 दिवसांचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग आता कार्यकर्ता विकास वर्ग 2 म्हणून ओळखला जाणार आहे. या शिवाय अभ्यासक्रमातही धोरणात्मक बदल केले जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
समाज परिवर्तनाच्या दृष्टीने पंचपरिवर्तन धोरण स्वीकारले जाणार आहे. यात कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य, स्व ची ओळख असा पंचसूत्रीवर भर दिला जाणार आहे. अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर गतवर्षीच्या 13168 इच्छुक संख्येपेक्षा 27 हजार 362 अशा मोठ्या प्रमाणात 20 ते 35 वयोगटातील तरुणांनी संघ परिवारात प्रवेशाची इच्छा व्यक्त केल्याची माहिती वैद्य यांनी दिली.