नागपूर : जिल्ह्यातील 5 महसुली मंडळात दुष्काळसदृश्य परिस्थिती | पुढारी

नागपूर : जिल्ह्यातील 5 महसुली मंडळात दुष्काळसदृश्य परिस्थिती

नागपूर : जून ते सप्टेंबर, 2023 या कालावधीत ज्या महसुली मंडळांमध्ये सरासरी पर्जन्याच्या 75 टक्क्यापेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मिलिमिटरपेक्षा कमी झाले अशा नागपूर जिल्ह्यातील 11 महसुली मंडळांपैकी  5 मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाली आहे. यात ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूली मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत आणि त्या महसूली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र  बसविण्यात आलेले नाही अशा सावनेर तालुक्यातील चिचोली (खापरखेडा), मौदा तालुक्यातील तारसा, रामटेक तालुक्यातील पवनी व हिवरा बाजार, कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी या महसुली मंडळात दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे.
दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या महसुली मंडळात उपाययोजना व सवलतीची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जमीन महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5 टक्के सुट. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती व उपाययोजना करण्यात देणार आहेत.

Back to top button