जनता ठाकरेंच्या मागे नाहीच! चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा | पुढारी

जनता ठाकरेंच्या मागे नाहीच! चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जेव्हा तुम्हाला लोकांचे भले करण्याची संधी होती तेव्हा तुम्ही घरात बसून होते. यामुळेच जनता उद्धव ठाकरे यांच्या मागे उभी राहणार नाही, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.

ते म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री केवळ दोन दिवस घराच्या बाहेर पडले. त्याचवेळी विरोधी पक्षात असणारे देवेंद्र फडणवीस हॉस्पिटलमध्ये जाऊन लोकांची काळजी घेत होते. देशाच्या विकासाची प्रगतीची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पामागे जनता उभी राहील.

महाविकास आघाडीच्या राजकारणाचा आधार जनतेत संभ्रम पसरविण्याचा आहे. त्यामुळे रोज सकाळी उठून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो. महायुतीच्या ८० टक्के जागांचा निर्णय झाला असून उर्वरित जागांवर येत्या दोन दिवसांत निर्णय होईल. महायुतीमध्ये कोणताही ताणतणाव नसून सर्वांचे एकमत आहे. दिल्ली बैठकीतचर्चा झाल्यावरच उमेदवारीबाबत योग्य निर्णय होईल.

रोहित पवार संदर्भात, ते म्हणाले, ज्याला कर नाही तर डर कशाला! चूक केली नसेल तर ईडीच्या नोटीसचे उत्तर साधेपणाने देता येते. चौकशीअंती निष्कर्ष निघेलच. मात्र ते सोडून तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, राज ठाकरे हे परखड बोलणारे व्यक्तिमत्व आहे. मनसे आणि भाजपाची भूमिका विसंगत नाही; चर्चाही नाहीच,पंकजा मुंडे आमच्या नेत्या असून संसदीय बोर्ड निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

Back to top button