धर्म राजकारणापासून दूर ठेवा, वाढतोय मुस्लिमद्वेष : आमदार अबू आझमी | पुढारी

धर्म राजकारणापासून दूर ठेवा, वाढतोय मुस्लिमद्वेष : आमदार अबू आझमी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : हिंदू -मुस्लिम ऐक्याची आजवर कितीतरी उदाहरणे असली तरी सध्या स्थितीत देशाच्या सभ्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असून राम मंदिराचा विषय आटोपताच कधी मथुरा कधी ज्ञानवापी मशीद असे मुद्दे पुढे केले जात आहेत. न्यायालयात गेल्यास न्याय मिळेलच असा विश्वास राहिलेला नाही असेही म्हणाले. आगामी लोकसभा निवडणूक संदर्भात आमची राज्यात कुणाशीही आघाडी झालेली नाही. लोकसभा लढण्यात स्वारस्य नसले तरी विधानसभा निवडणुकीत आपल्यासह किमान आठ ते दहा जागा लढविण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. देशात सध्या स्थितीत हिंदू -मुस्लिम संदर्भात संभ्रम निर्माण केला जात आहे. रोज द्वेषपूर्ण विधाने काही विशिष्ट नेत्यांकडून केली जात आहेत. या विरोधात जनजागृती करण्यासाठी संविधान बचाव देश बचाव या जनजागरण यात्रेच्या निमित्ताने सध्या विदर्भात आहेत यानिमित्ताने ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

धर्माला राजकारणापासून वेगळे करा, कधीकाळी साधू मंदिरात तर राजकारणी विधिमंडळात, संसदेत असायचे आज साधू -महंत संसदेत, विधिमंडळात तर राजकारणी मंदिरात अशी अवस्था पाहायला मिळत आहे 11.5% मुस्लिम लोकसंख्या असताना भारतात हिंदू संकटात कसा येऊ शकतो,केवळ मुस्लिमांना बदनाम केले जात आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून परस्पर द्वेष वाढवला जात आहे. केवळ कुणाच्या आस्था, भावनेवर निर्णय होत राहिले तर अल्पसंख्यांकांची सतत उपेक्षाच होत राहील, हे देशासाठी निश्चितच चांगले नाही असा आरोप समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आजमी यांनी केला.

देशात मोठ्या प्रमाणात खाजगीकरण सुरू असून हा आरक्षण संपविण्याचा डाव आहे. संविधान धोक्यात आहे. मुस्लिम तर आरक्षणाच्या बाबतीत आधीच संकटात आहेत पण इतरांचे आरक्षण धोक्यात आले आहे. 10 टक्के मराठा आरक्षण निर्णयाचे स्वागत करताना त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेत ते टिकावे अशी अपेक्षा व्यक्त केली. मराठा आंदोलकांवर लावलेले गुन्हे मागे घेतले जावे, कुणालाही अटक होऊ नये याकडे लक्ष वेधले. कंत्राटीकरणाच्या माध्यमातून युवकांना वेठीस धरले जात आहे. मागच्या दाराने आरक्षण संपवण्याचे हे षड्यंत्र आहे. गेल्या दहा वर्षाच्या काळात देशात 14 लाख कोटी रुपयांचे कॉर्पोरेट कर्ज माफ करण्यात आले. शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. केवळ भाषण देण्यासाठी शाहू,फुले आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले जाते मात्र त्यांच्या ध्येयधोरणानुसार वागण्यास कुणीही तयार नाही असा आरोप करीत दापोली येथील याकूब खान दर्गा पर्यटन स्थळ घोषित व्हावे,50 कोटी रुपये विकासासाठी मिळावे अशी मागणी त्यांनी केली. मुस्लिम आरक्षणाकडे सरकार जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहे आज द्वेषपूर्ण बोलण्याची फॅशन झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला वारंवार फटकारले असताना कोणीही दाखल घेण्यास तयार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर मग तो कुठल्याही धर्माचा असो राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, किमान पाच वर्षे त्याला कारावास द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी कार्याध्यक्ष प्रतापराव होगाडे, मायाताई चवरे आदी उपस्थित होते.

Back to top button