नागपूर : आठवडाभरात ७ हत्यांनी उपराजधानी हादरली | पुढारी

नागपूर : आठवडाभरात ७ हत्यांनी उपराजधानी हादरली

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उपराजधानी नागपुरात गेल्या सात दिवसात सात हत्येच्या घटना घडल्या आहेत. व्यक्तिगत, क्षुल्लक कारणातून झालेल्या या घटनांनी पुन्हा एकदा सामाजिकदृष्ट्या प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे.

अमितेशकुमार यांच्या जागी नागपूर पोलीस आयुक्त म्हणून रवींद्र सिंगल यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी गुंडांची ओळख परेड घेत ताकीदही दिली, मात्र रोजच्या या घटना त्यांची सातत्याने कसोटी घेत आहेत. गेल्या 24 तासात नागपुरात दोन घटना घडल्या. क्रिकेट खेळताना झालेल्या वादात कळमना परिसरातील गुलमोहर नगरात अज्जू शेख (वय वर्षे 24) याची हत्या करण्यात आली. करण (19 वर्षे) असे आरोपी युवकाचे नाव आहे. अज्जू ,करण आणि वस्तीतील इतर मित्र गल्लीत क्रिकेट खेळत होते. दरम्यान क्षुल्लक कारणावरून अज्जू आणि करण यांच्यात वाद झाला. थोड्या वेळानंतर करण हातात शस्त्र घेऊन परत आला आणि त्याने अज्जूला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले.तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुसऱ्या एका घटनेत उसने दिलेले पैसे परत मागितल्यामुळे नंदनवन परिसरात दोन आरोपींनी एकाचा डोक्यावर फरशी घालून खून केला तर त्याच्या मित्राला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. अद्याप आरोपी पोलिसांना सापडलेले नाहीत. नीरज शंकर भोयर (वय 28) राहणार गरोबा मैदान असे मृतकाचे नाव असून विलास रामकृष्ण वानखेडे आणि त्याचा साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. विलास आणि नीरज दोघे खाजगी काम करतात. विलासने नीरज कडून काही पैसे उधार घेतले होते मात्र तो पैसे परत देत नव्हता. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होता. आठवड्याभरात नंदनवन,कळमना वाठोडा हद्दीत या खुनाच्या घटना घडल्या आहेत.

Back to top button