मंडल आयोगाला विरोध करणारे आज काय करतायत? अनिल देशमुख यांचा भाजपवर निशाणा

अनिल देशमुख
अनिल देशमुख
Published on
Updated on
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कधीकाळी ज्यांनी मंडल आयोगाला विरोध करीत कमंडल यात्रा काढली होती आणि मंडल आयोग लागु केला म्हणुन व्ही.पी. सिंग सरकारचा पाठींबा काढुन ते सरकार पाडणारे आता शरद पवार यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही असे सांगत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जर धमक असेल तर आरक्षणाचा प्रश्न त्यांनी तातडीने सोडवावा. उगाच स्वत:च्या निष्क्रियतेचे खापर हे दुसऱ्यावर फोडू नये असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर केला आहे.
मराठा समाजाला आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही. परंतु त्यांना आरक्षण देतांना ओबीसी समाजावर अन्याय होवू नये अशीच भूमिका  आमची आहे. जो पर्यत लोकसभेत केंद्र शासन घटना दुरुस्ती करत नाही व  आरक्षणाचा टक्का वाढवुन घेत नाही तोपर्यत यावर तोडगा निघू शकत नाही. यासाठी राज्य सरकारला केंद्राची मदत घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकारने सर्वपक्षीय आमदार व खासदार यांना दिल्लीमध्ये नेवून पंतप्रधान यांच्यासोबत बैठक लावावी. केंद्रात स्वत:च्याच  पक्षाचे सरकार असल्याने देवेंद्र फडणविस हे त्यांची मदत घेवून मराठा समाजाला आरक्षण देवू शकतात. परंतु स्वत: काहीच करायचे नाही आणि दुसऱ्यांकडे बोट दाखवुन समाजा- समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे काम ते करीत असल्याचा आरोपही अनिल देशमुख यांनी केला आहे.
सरकार आल्यास धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय पहिल्याच कँबीनेटमध्ये घेवू असे आश्वासन बारामतीमध्ये देवेंद्र फडणविस यांनी २०१३ मध्ये दिले होते. या आश्वासना नंतर ते मुख्यमंत्री सुध्दा झाले, पण  धनगर समाजाला दिलेले आश्वासन ते पाळु शकले नाहीत.  मुख्यमंत्री असतांना धनगर समाजाच्या वतीने एका कार्यक्रमात " क्या हुवा तेरा वादा" हे गाणे वाजवून आश्वासनाची आठवण सुध्दा फडणविस यांना करुन दिली होती. परंतु अद्यापही यावरही त्यांनी कोणताच तोडगा काढला नाही. केवळ आश्वासन द्यायचे आणि तोडगा काढायचा नाही हा त्यांचा जुना फंडा आहे. यामुळे मंडल आयोगाला विरोध करणारे आणि केंद्रातील सरकार पाडणारे आता वेगळी भाषा बोलत आहे. त्यांचा रंग बदलण्याचा प्रकार हा सरडयालाही लाजवेल असा आहे, असेही अनिल देशमुख म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news