

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मी कुणाच्याही धमकीला घाबरत नाही, ओबीसीची लढाई 35 वर्षापासून लढतो आहे. देशभरामध्ये लढत आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर लढलो आहे. मोठमोठ्या रॅली केल्या, ओबीसीसाठी लढतो आहे,यापुढेही लढणार असल्याचे ना छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
गेले काही दिवस मनोज जरांगे-छगन भुजबळ वाकयुद्ध पेटले आहे. समाज माध्यमांवर जो मेसेज आलेला आहे. 24 तारखेला भुजबळांचं घर जरा बघायचं, याचा अर्थ जालना आणि बीडला जसं केलं तसं करायचं आहे. हा त्याचा अर्थ आहे. फायरिंग केली जाईल, हा निरोप जो आहे तो काल माझा लोकांकडून मला कळाला. एसआयटीमधून महाराष्ट्र पोलीस काम करते. इंटेलिजन्स त्यांनी असं कळविला आहे की, त्यांच्यावर फायरिंग होण्याची शक्यता आहे. अधिकाधिक काळजी घ्या, त्यानंतर पंधरा-वीस पोलीस पाठीमागे असा सल्ला देण्यात आला आहे, पण मी घाबरत नाही असे भुजबळ म्हणाले.
मराठा समाजाला माझा विरोध नाही. त्यांना वेगळं आरक्षण द्या, मराठा समाजाचे देखील तेच म्हणणं आहे. हाऊसमध्ये सदस्यांना विचारले, सर्व पक्षाचे नेते तेच बोलतात की, ओबीसीला धक्का न लागता आरक्षण द्या एवढेच म्हणणं आहे. खोट्या पद्धतीने सर्टिफिकेट देण्याचे काम सुरू आहे. कुणबी सर्टिफिकेट देत आहे.समोरून तुम्हाला आरक्षण भेटणार नाही.जी ओबीसीची लोक आहेत त्यांच्यावर मोठा अन्याय होणार आहे. जवळजवळ ओबीसींचे आरक्षण संपुष्टात येणार आहे. सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय मी वाचून दाखवले. आतापर्यंत मराठा समाजाचे इतके मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण का दिलं नाही. त्यांनी सांगितलं त्यांची ती विवेक सद्बुद्धी होती योग्य निर्णय होता आणि त्यांना धन्यवाद दिले पाहिजे असेही भुजबळ म्हणाले.