Nagpur University111th Convocation : नव्या शैक्षणिक धोरणाने देश वैश्विक ज्ञानशक्ती; राष्ट्रपतींचे प्रतिपादन

Nagpur University111th Convocation : नव्या शैक्षणिक धोरणाने देश वैश्विक ज्ञानशक्ती; राष्ट्रपतींचे प्रतिपादन
Published on: 
Updated on: 
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भारतीय मूल्यांधिष्ठित सर्वांना उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण हा गाभा असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून भारत देश एक वैश्विक ज्ञानशक्ती (ग्लोबल नॉलेज पॉवर) म्हणून स्थापित होईल, असा विश्वास  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केला. विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केल्याबद्दल प्रशंसा केली.
कविवर्य सुरेश भट सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १११ वा दीक्षांत समारंभ शनिवारी पार पडला.  अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षणमंत्री  चंद्रकांतदादा पाटील, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून औपचारिक पदवी हे शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट नसून वेगाने बदलत जाणाऱ्या जगात निरंतर शिक्षण हेच प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असावे, असे आवाहन केले. तंत्रज्ञानाच्या सदुपयोगाने देश व समाजाचे हित जोपासले जाऊ शकते तर त्याच्या दुरुपयोगाने मानवतेचे नुकसान होऊ शकते. सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) उपयोग आपले जीवन सुकर करत आहे परंतु अतिरेक  सामाजिक स्वास्थासाठी अतिशय घातक आहे. तंत्रज्ञानाच्या चुकीच्या उपयोगाने निर्माण होणाऱ्या समस्येच्या पार्श्वभूमीवर नैतिक शिक्षणाचा मार्ग उपकारक असल्याचे राष्ट्रपती मुर्मु यांनी सांगितले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची शतायुषी वाटचाल उच्च परिमाण स्थापित करणारी आहे. समृद्ध वारसा जोपासणाऱ्या या विद्यापीठाच्या  विद्यार्थ्यांनी सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रात महत्वाचे योगदान दिल्याचा गौरवास्पद उल्लेख करुन राष्ट्रपती म्हणाल्या, विद्यापीठाचे माजी विद्यार्थी अनेक क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांचे सहाय्य घेऊन विद्यापीठाला ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलंस करावे, हे विद्यापीठ संशोधन, नाविन्यतापूर्ण शिक्षण व तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे या विद्यापीठातील फॅकल्टी मेंबर्सच्या नावाने ६० हून अधिक पेटंटची नोंदणी झालेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी इंक्युबॅशन सेंटर निर्माण केले आहे. स्थानिक प्रश्न आणि गरजा लक्षात घेऊन संशोधनावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सर्व जग आज ग्लोबल व्हिलेज झाले असून कुठलीही संस्था जगापासून अलिप्त राहू शकत नाही. आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम आणि आंतरराष्ट्रीय सहयोगावर विद्यापीठाने भर द्यावा. विद्यार्थ्यांनी स्थानिक समस्या व गरजांनुसार नाविन्यपूर्ण संशोधनाला प्राधान्य दिले तरच जागतिक आव्हानांचा सामना करणे शक्य होईल, असे राष्ट्रपती म्हणाल्या. दरम्यान, केवळ शिक्षण प्रदान करण्यावरच न थांबता शैक्षणिक संस्थांनी समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडावी. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना मदत करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. अशा वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून अमृत काळात देशाच्या विकासामध्ये योगदान द्यावे. विद्यापीठाच्या पदवी प्राप्त तसेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय असल्याबद्दल विशेष समाधान व्यक्त केले. राष्ट्रपतींनी संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील संदर्भही दिला.
व्हावे मोठे बाबूसाहेब l काम जुजबी पैसा खूब l
मोठी पदवी दिखाऊ ढब l ही उच्चता म्हणोचि नये ll

जागतिक संधीचा लाभ घ्यावा – राज्यपाल

दरम्यान, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा स्वीकार केल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होत असल्याचा विश्वास राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला. पुर्वी ब्रिटीशकालिन मानसिकतेच्या प्रभावातून नौकरीसाठी शिक्षण होते. आता प्रधानमंत्री मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडत आहेत. विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी न शिकता जागतिक स्तरावरील विकसित कौशल्य आत्मसात करावे, सोबत एखादी जागतिक भाषा आत्मसात करावी. कुशल मानव संसाधन निर्माण करण्यासोबतच योग शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन या क्षेत्रातील जागतिक संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.

विकासात विद्यापीठाचे योगदान महत्वाचे –  गडकरी

विदर्भाच्या विकासात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मोलाचे योगदान आहे.  भविष्यात शिक्षणालाच महत्व आहे. प्रधानमंत्र्यांनी शिक्षणाचे संपत्तीत रूपांतर करण्याचे आवाहन केले आहे. शिक्षणामुळेच जागतिक आर्थिक महासत्तेचे देशाचे स्वप्न साकार होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गुणात्मक मनुष्यबळावर फडणवीस यांचा भर

गुणात्मक मनुष्यबळ तयार करणे ही काळाची गरज आहे. जागतिक स्तरावर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करू शकेल अशी युवापिढी घडविण्याचे आव्हान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने स्वीकारावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विद्यापीठ नवसंशोधनाचे केंद्र म्हणून विकसित होत असून स्टार्टअप इको सिस्टीममध्ये महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातही नव संशोधन आणि स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून उत्तम कार्य सुरु आहे. विद्यापीठात नवसंशोधन तसेच  विकासासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेतून डीएससी. पदवी प्राप्त करणारे डॉ. रामचंद्र हरीसा तुपकरी आणि डॉ. टि. व्ही. गेडाम सुवर्णपदक आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थिनी राजश्री ज्योतीदास रामटेके यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदक देवून गौरविण्यात आले. यासोबतच विद्या शाखानिहाय १२९ संशोधकांना या कार्यक्रमात आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविकातून कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी विद्यापीठाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती दिली. प्रारंभी दीक्षांत मिरवणुकीद्वारे माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. यावेळी मान्यवरांसह कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल साबळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मनोजकुमार डायगव्हाणे, डॉ. नंदकिशोर करडे, वामन तुर्के, डॉ. संतोष चव्हाण, अजय चव्हाण, डॉ. अजय अग्रवाल, डॉ. समय बनसोड, डॉ. पांडुरंग डांगे, डॉ. योगेश भुते, डॉ. देवेंद्र भोंगाडे, डॉ. निळकंठ लंजे, अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, डॉ. संजय कवीश्वर, डॉ. प्रशांत कडू व डॉ. शामराव कोरेटी यांचा समावेश होता. दीक्षांत मिरवणूक यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी विशेष कार्य अधिकारी श्री. प्रदीप बिनीवाले, प्रभारी सहाय्यक कुलसचिव श्री गणेश कुमकुमवार यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. वर्षा देशपांडे व डॉ. अमृता इंदूरकर यांनी पार पाडली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news