नागपुरातील ‘त्या’ पुराने केल्या ४०० कोटींच्या नोटा खराब !

नागपुरातील ‘त्या’ पुराने केल्या ४०० कोटींच्या नोटा खराब !

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात २३ सप्टेंबर रोजीच्या अतिवृष्टी व पुराने प्रचंड नुकसान झाले. आजही या नुकसानीचे परिणाम पुढे येत आहेत. आता सीताबर्डी येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे मोठे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. या बँकेतील सुमारे ४०० कोटी रुपयांच्या चलनी नोटा पाण्यामुळे खराब झाल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे. यासंदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे यावर भाष्य करण्यात नकार दिला आहे. शेजारीच मोठा नाला, नागनदी संगम असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते. विशेष म्हणजे या बँकेचे हे क्षेत्रीय कार्यालय आहे. या कार्यालयातून बँकेच्या अन्य शाखांमध्ये चलन वितरित होत असते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर रोजीच्या पावसामुळे बँकेच्या तिजोरी कक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते व त्याचा फटका तेथे साठवून ठेवलेल्या नोटांच्या बंडलांना बसला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्याही परिस्थितीत धावपळ करुन पाणी उपसण्याची कार्यवाही केली. मात्र, तरीही सुमारे ४०० कोटी रुपयांच्या कागदी चलनाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. रिझर्व्ह बँकेसोबत असलेल्या व्यवस्थेनुसार बँक ऑफ महाराष्ट्र करन्सी चेस्ट चालवते. बँकेच्या वतीने चलन वितरित केले जाते. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्यावर रिझर्व्ह बँकेच्या पथकाने बँक ऑफ महाराष्ट्रला भेट देऊन पाहणी केली. रिझर्व्ह बँकेच्या पथकाकडून खराब झालेल्या नोटांची मोजणी करण्यात आली. त्याचा रेकॉर्ड तयार करण्यात आल्यावर त्या नष्ट केल्या जातील, अशी माहिती आहे. दरम्यान, खराब झालेल्या नोटा तातडीने बदलण्यात आल्या आहेत. तथापि, यात चलनाचे नुकसान झाले असले तरी प्रत्यक्षात पैशाचे फारसे नुकसान होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news