नागपूर : व्यावसायिकाला गंडविणारी नायजेरियन टोळी गजाआड; पासपोर्टसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

नागपूर : व्यावसायिकाला गंडविणारी नायजेरियन टोळी गजाआड; पासपोर्टसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील एका व्यावसायिकाला औषध बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑर्गनिक पावडरच्या नावाखाली १५ लाखांहून अधिक रकमेचा गंडा घालणाऱ्या नायजेरियन टोळीच्या मुसक्या बांधण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली, आरोपीकडून हल्ला करण्याचा आणि पळून जाण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांनी दिली.

चिनोन्सो न्वाकोहो राफेल (वय ३७) रा. नायझेरीया ह.मु. डोंबिवली पूर्व जि. ठाणे, बबलुकुमार रामस्वरुप शर्मा रा. इंदौर (म.प्र.), शकील अहमद मो. याशीन शेख रा. वाराणसी (उ.प्र.) ह.मु. राजेश इंकलव मिरा रोड पूर्व जि. ठाणे लक्ष्मण गणपत बागवे (रा. डोंबीवली (पूर्व) जि. ठाणे) अशी अटकेतील आरोपीचे नावे आहेत. त्याच्याकडून सात मोबाईल, एक लॅपटॉप, बिलबुक डायरी, तसेच लिबेरीयाचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केला. उज्ज्वलनगर, झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी फिर्यादी निलेश जिवतोडे (वय ४५) यांचे लाईफ लाईन या नावाने औषधीचे दुकान आहे. औषधी विक्री सोबतच त्यांचे एक्सपोर्टचेही काम आहे. चिनोन्सो याने ६ सप्टेंबरला निलेशशी संपर्क साधला. ऑरगॅनिक पावडरची मागणी केली. हे पावडर भारतात कुठे मिळते, त्याची सुध्दा माहिती दिली. निलेशने मुंबईतील वैशालीकडून १ लाख ८५ हजार रुपयाचे पावडर खरेदी केले व माहिती चिनोन्सोला दिली. चिनोन्सो नागपुरात पावडर पाहण्यासाठी आला. डील फायनल करुन शंभर किलोची ऑर्डर दिली. त्यानुसार निलेशने मुंबईत वैशालीशी संपर्क साधून १५ लाख ८५ हजार रुपयाची ऑर्डर दिली. मात्र, पावडरचे जे ९ पॅकेट आले. त्यात माती होती. चिनोन्सो हा टोळीचा म्होरक्या आहे. पोलिसांनी त्याचे बँक खाते गोठविले असून ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय नायझेरीयातील बँकेत जवळपास ९ लाख रुपये आहेत. ती रक्कम परत मिळविण्यासाठी सायबर पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईच्या सीआयडी कार्यालयात त्याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल असून नायझेरीयाचे पासपोर्ट सीआयडी कार्यालयाकडे जप्त आहे. त्याच्याकडे टीनी अगस्तीन या नावाने लिबेरीयाचा पासपोर्ट मिळून आला. ही कामगिरी सायबर पोलिस ठाण्याचे वपोनि अमित डोळस, सपोनि मारूती शेळके, पोहवा शैलेश, पराग, चंद्रशेखर, प्रिया यांनी केली.

भारतीय मुलीशी केले लग्न

दरम्यान,चिनोन्सो हा पाच वर्षांपूर्वी भारतात आला. त्याने येथील एका मुलीशी लग्न केले. त्याला एक मुलगी सुध्दा आहे. तो कपड्याचा व्यवसाय करायचा. नंतर तो सायबर गुन्हेगारीकडे वळला. या गुन्ह्यात त्याने पत्नीलाही जोडले. फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात जमा करण्यासाठी त्याने इतर आरोपींना पैशाचे आमिष दाखविले. चिनोन्सो आणि त्याची पत्नी वैशाली उर्फ स्टेफी हे दोघेही लोकांना गंडवित होते तर लक्ष्मण, शकील आणि बबलु कुमार हे तिघे बँक खाते उघडून त्यात फसवणुकीची रक्कम जमा करीत होते.

Back to top button