

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उमरेड मार्गावरील दिघोरी टोल नाक्यापुढे बहादुरा फाटा नजीक रिक्षाचालकाचा ताबा सुटल्याने दोन वृद्ध महिला खाली पडल्या. यातील एका वृद्ध महिलेला ट्रकने चिरडल्याने मृत्यू झाला, तर दुसरी महिला बचावली.
गोंदियातील दोन वृद्ध महिला उमरेड मार्गावरील दिघोरी टोल नाक्यापुढे बहादुरा फाटा येथे आयोजित पं. प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुराण ऐकण्यासाठी नागपुरात आल्या होत्या. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत संघर्षनगरनजीक रिक्षा चालकाने रिक्षा वेगाने पळविली. यामध्ये रिक्षाचालकाचा ताबा सुटल्याने दोन्ही वृद्ध महिला खाली पडल्या. यात एका महिलेला ट्रकने चिरडले. यातील दुसऱ्या महिलेने ऑटोतून उडी मारल्याने तिचे प्राण बचाविले. गीताबाई रमेश कावडे (वय ६०, रा. चांदोरी मुंडीकोटा, ता. तिरोडा जि. गोंदिया) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.