

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाचे नक्कीच आम्ही समर्थन करतो. परंतु पाटील जी मागणी करीत आहेत, तसे काहीही आम्ही होऊ देणार नाही. पाटील कुणबी जातीचे प्रमाणपत्र व ओबीसी समाजात दाखल होण्याचे बोलत आहेत, असे राज्य सरकारने केल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक ओबीसी घरातून बाहेर पडत विरोध करेल. यासंदर्भात आमचीही बैठक राज्य सरकार सोबत झाली आहे. सरकारने आम्हाला पण आश्वासन दिले आहे की, ते मराठा समाजाला ओबीसीमधून वाटा देणार नाहीत. पण जरांगे पाटलांच्या दबावाला बळी पडून आरक्षण देण्यासाठी सरकार पाऊल उचलणार असेल त्यादिवशी या सभेपेक्षा पाचपट मोठी सभा ओबीसी समाजबांधवांची राहील असा इशारा ओबीसी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासाठी सध्या मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. पाटील यांनी पुन्हा राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी देखील पुन्हा एकदा राज्य सरकारला ठणकावले आहे.