नागपूर : कोंढाळी, निलडोह , डिगडोह ग्रामपंचायत निवडणुकांना स्थगिती कायम | पुढारी

नागपूर : कोंढाळी, निलडोह , डिगडोह ग्रामपंचायत निवडणुकांना स्थगिती कायम

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी, निलडोह आणि डिगडोह या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी (दि. १०) दोन आठवडयांसाठी स्थगिती कायम केली आहे.

नगर विकास विभागाने ग्रामपंचायत निवडणुका घेऊ नका, याबाबत राज्य निवडणूक आयोगाला निवेदन दिले होते. हे निवेदन आयोगाने खारीज केले आहे. दरम्यान, नगर पंचायत व नगर परिषद यासंदर्भात नगर विकास विभागाने अधिसूचना काढली असल्याची बाब मंगळवारी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे हायकोर्टाने कोंढाळी, निलडोह आणि डिगडोह या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती कायम ठेवली. हायकोर्टाने निवडणूक आयोगाने ही बाब विचारात घेवून निर्णय घ्यावा आणि राज्य सरकार यासंदर्भात पुढील कारवाई कशी आणि केव्हा करणार व काय पावले उचलणार, अशी विचारणा केली आहे. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्यासमक्ष ही सुनावणी झाली.

कोंढाळी ग्रामपंचायतीसाठी चरणसिंग ठाकूर तर निलडोह आणि डिगडोह ग्रामपंचायतींसाठी आमदार समीर मेघे यांनी याचिका दाखल केली आहे. कोंढाळी व निलडोह या दोन्ही ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना काढली आहे. डिगडोहसाठी ग्रामपंचायत ते नगर परिषदेकरिता अधिसूचना काढली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. मोहीत खजांची, अ‍ॅड. महेश धात्रक, राज्य निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.

Back to top button