नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका व्यापाऱ्याला ५ कोटी ४० लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या १८ आरोपींविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांना प्राप्त तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व आरोपी मुंबई येथील आहेत. आरोपींनी नेटवर्किंग कंपनीत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला १५ ते २० टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केली . अंकुरकुमार अग्रवाल (रा. दिघोरी) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुरकुमार अग्रवाल यांना नागपूर शहरातील आरोपी मंदार कोलते याने मुकेश कोलते (रा. रायगड) याच्याशी ओळख करून दिली. त्याने एक्सस्ट्रीम नेटवर्क प्रा. लिमिटेड कंपनीत मोठी गुंतवणूक केल्यास दरमहा १५ ते २० टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले. अग्रवाल यांनी आरोपीच्या सांगण्यावरून आधी एक कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे ठरविले.
दरम्यान, आरोपी मुकेश चव्हाण (३६, रा. रायगड), मंदार कोलते (४५, रा. नागपूर), गोयल ऊर्फ सूरज डे (४५, रा. कांदवली, मुंबई), मंगेश पाटेकर उर्फ दिनेश कदम (४४, रा. मुंबई), महोनिश ऊर्फ राहुल (३५, रा. मुंबई), अमन पांडे (४०, रा. कांदीवली), भारत ऊर्फ सुलेमान (४०, रा. मुंबई), युनूस शेख (४०, रा.हसनबाग), दिनेश मिश्रा (४२, रा. कांदीवली पूर्व, मुंबई), अजय वाघमारे (३३. रा. मुंबई), राकेशकुमार (५०, रा. मुंबई), राजू मंडल (४५, रा. मलाड, मुंबई), राहुल गायकवाड (२८, रा.गोरेगाव, मुंबई), संदीप पाटील (३३,गोरेगाव, मुंबई), अल्पेश पटेल (३३, रा. गोरेगाव, मुंबई) करण (३५, रा. गोरेगाव, मुंबई), विक्रांत (४७, रा. मुंबई) आणि दिनेश जोशी (४५, रा. मुंबई) यांनी टोळी तयार करून अग्रवाल यांना ५ कोटी ३९ लाख ५० हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. अग्रवाल यांच्या धनादेशाचाही गैरवापर करीत रक्कम काढली. अखेर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.