सरकारला सद्बुद्धी दे बाप्पा : विजय वडेट्टीवार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आजचा पवित्र दिवस असून गणपतीची स्थापना आमच्या घरी करण्यात आली. गणपती बुध्दीची देवता आहे. यानिमित्ताने सगळ्यांना सुखी आनंदी राहू दे. महाराष्ट्रावर, देशावर कोणाची वाईट नजर पडू देऊ नको, अशी प्रार्थना केली. सरकारला शेतकऱ्यांना भरभरून मदत करण्याची सद्बुद्धी बाप्पांनी द्यावी अशी अपेक्षा विरोधो पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
गणपती उत्सवाला गालबोट न लागता तो उत्साहात साजरा व्हावा, तोडफोडीचे राजकारण संपवून मन दुखावणारं राजकारण बंद होऊ दे अशी प्रार्थना केल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. तसेच गरिबाला गव्हाच्या ऐवजी मका दिला जात आहे. गरीब मका खातो का? असा सवाल देखील वडेट्टीवार यांनी यावेळी केला.
पुढे आरक्षण प्रश्नावर बोलत असताना वडेट्टीवार म्हणाले की, कुणबी कृती समितीने आंदोलन स्थगित केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने हे आंदोलन आता पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील ७ दिवसात सरकार बैठक लावतील अशी अपेक्षा आहे. फूट वगैरे पडायचा विषय नाही. ओबीसी हितासाठी जो लढतो तो आंदोलनात टिकेल ज्याला पक्षाची झुल पांघरायची आहे ते नालायक आहेत. आंदोलन संपले म्हणजे लढाई संपली असा त्याचा अर्थ नाही. आमच्या मुळावर जो येईल त्याला आम्ही योग्य वेळी धडा शिकवू असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.