

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कळमेश्वर- सावनेर रोडवरील वरोडा शिवारामध्ये असलेल्या युनिक ट्रेडिंग कंपनीच्या कापूस जिनिंगमध्ये रविवारी भीषण आग लागली. गोदामातील कोट्यवधी रुपयांच्या कापसाच्या गठानी जळून खाक झाला. अचानक आग लागल्याने कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. कापसाची वाहने जिनिंगच्या परिसरातून बाहेर काढण्यासाठी एकच हल्लकल्लोळ उडाला.
कळमेश्वर पालिकेच्या अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली परंतु अग्निशमन विभागाकडून अग्निशमन गाडीवर चालक नसल्याचे कळविण्यात आले. वारंवार नागपूर, सावनेर येथील अग्निशमन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. बरीच उशिरा कळमेश्वर पालिकेची अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळावर पोहोचली. युनिक ट्रेडिंग कंपनी ही वरोडा गाव शिवारामध्ये असून खाजगी कापूस जिनिंग कंपन्यांमधून ही कंपनी कापसाच्या गठण विकत घेऊन त्यापासून धागा तयार करण्याचे काम करते. या कंपनीमध्ये 50 चे वर कर्मचारी कामाला आहेत. कंपनीतील मशिनरी,कापूस जळून खाक झाल्याची माहिती कंपनीचे मालक आसिफ अन्सारी नागपूर यांनी दिली. अचानक कंपनीमधील सरकीच्या गोदातून धूर निघू लागला. आग लागल्याचे निदर्शनास येताच सर्वांची धावपळ सुरू झाली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले.जिनिंग सुरू असताना शॉर्टसर्किट अथवा ठिणगी उडाल्याने ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.