

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) वार्ड क्रमांक ३४ मध्ये मंगळवारी(दि. ११) दुपारी अचानक आग लागली. वार्डात धूर पसरल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची काही काळ तारांबळ उडाली. मात्र, गांभीर्य लक्षात घेता वेळीच कर्मचाऱ्यांनी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवल्याने रुग्णांचा जीव भांड्यात पडला.
मेयो रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अस्थिरोग विभागाच्या वार्ड क्रमांक ३४ मध्ये डॉक्टरांची स्वतंत्र खोली आहे. या खोलीत शाॅर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. वार्डात धूर शिरल्याने नातेवाईकांत धावपळ उडाली. तातडीने मेयो रुग्णालयातील पाॅवर सेफ्टी ऑफिसर,महाराष्ट्र सुरक्षा दल जवानांनी वार्डात पोहोचून आगीवर अग्निशमन यंत्रातून वायूचा मारा केला. त्यापूर्वी येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला . मेयो प्रशासनाने यासंदर्भात चौकशी अहवाल मागितला आहे .