नागपूर : नरखेड खरेदी विक्रीवर माजी मंत्री अनिल देशमुखांचे वर्चस्व

नागपूर : नरखेड खरेदी विक्रीवर माजी मंत्री अनिल देशमुखांचे वर्चस्व

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या ४० वर्षापासून माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या ताब्यात असलेल्या नरखेड खरेदी विक्रीमध्ये देशमुख यांना शह देण्यासाठी सर्व पक्षांनी निवडणुक एकत्र लढविली होती. परंतु अनिल देशमुखांनी ११ पैकी ८ जागेवर दणदणीत विजय मिळविला. एका जागेचा निकाल ईश्वर चिठीत गेला. शुक्रवारी झालेल्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे लिलाधर ठाकरे हे सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ओम खत्री हे उपसभापती पदी निवडून आले.

मागील महिन्यात झालेल्या नरखेड खरेदी विक्रीच्या निवडणुकीत अनिल देशमुख यांना शह देण्यासाठी भाजपासह इतर सर्वच विरोध पक्ष व राष्ट्रवादीचा एक फुटीर गट एकत्र आले होते. परंतु, तरी सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ उमेदवार विजय झाले होते. यात लिलाधर ठाकरे, ओम खत्री, धनश्याम ठाकरे, रमेश आरघोडे, पाडुरंग नवरंग, कैलास गजबे, केशरबाई गाखरे, सुनीता बरडे हे विजय झाले तर उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे हिंमत नखाते, शरद काळे, केशव भिसे हे विजयी झाले होते.

यामुळे अनिल देशमुखांना शह देण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येऊनही त्यांना विजय संपादन करता आला नाही. आज नरखेड येथे सभापती व उपसभापती पदाची निवडणुक घेण्यात आली. या निवडणुकीत नरखेड बाजार समितीचे सभापती सुरेश आरघोडे ,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बंडोपंत उमरकर यांनी महत्वाची भूमिका बजावली. या निवडणुकीत इतर पक्षासोबत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट यांनी सुध्दा अनिल देशमुख यांच्या विरोधात ही निवडणुक लढविली होती. परंतु, शुक्रवारी झालेल्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अचानक त्यांनी भरलेला फार्म मागे घेवून राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. ठाकरे गटाने दिलेल्या अचानक पाठिंब्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news