

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शहर पोलिसांनी आज तब्बल 1200 किलो गांजा जाळून नष्ट केला. गेल्या साडेपाच महिन्यात जप्त करण्यात आलेला 2700 किलो गांजा येत्या 15 दिवसात याच प्रकारे सर्व प्रक्रिया पूर्ण करीत नष्ट केला जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन निमित्ताने आज (दि. २६) हा उपक्रम राबविण्यात आला. नागपूरला अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या मोहिमेंतर्गत हा बाराशे किलो गांजा नष्ट करण्यात आला, असेही अमितेश कुमार यांनी यावेळी स्पष्ट केले. एनडी पीएसने पारडी परिसरात काही दिवसांपूर्वी हा बाराशे किलो गांजा जप्त करण्याची कारवाई केली होती. नागरिकांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत 'ड्रग्स फ्री' नागपूर करण्यामध्ये आपला सहभाग घ्यावा, माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले. 1700 गुन्हेगारांवर एनडीपीएस अंतर्गत कारवाई गेल्या काही महिन्यात करण्यात आली आहे. पावणेतीन कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नागपूर पोलिसांनी जप्त केले असून 253 आरोपींना अटक करण्यात आली आहे.