

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील वाकी परिसरात पर्यटनासाठी गेलेले चार मित्र- मैत्रिणी कन्हान नदीत बुडून बेपत्ता झाले होते. त्यांची शोधमोहीम आजही (दि.१८) सुरू होती. आज दोन तरुणाचे मृतदेह दुपारी हाती लागले, तर इतरांचा शोध सुरू आहे.
विजय ठाकरे (वय १८, रा. नारा), अंकुश बघेल, (वय १७, रा. कामठी), अर्पित पहाळे, (वय १८, रा. कामठी), सोनिया म्हरस्कोल्हे (वय १७, रा. नारा, नागपूर), साक्षी कनोजीया (वय 18, रा. पाटणकर चौक), मुस्कान राणा (वय 18, रा. जरीपटका, नागपूर) असे सहा जण वाकी येथे गेले होते. ताजुद्दीन बाबा दरबारचे दर्शन करून हे सहा जण गाडीने कन्हान नदी पात्राच्या दिशेने गेले. याचवेळी चौघांना पोहायचा मोह झाल्याने ते पाण्यात उतरले.
बुडालेल्या चौघांपैकी अर्पित आणि सोनिया यांचे मृतदेह आज सायंकाळपर्यंत हाती लागले. तर दोघांच्या मृतदेहाचा शोध सुरूच आहे. एसडीएफपी टीम, स्थानिक पट्टीचे पोहणारे आणि खापा पोलिस व हितज्योती आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष हितेशदादा बन्सोड यांच्या टीमने यात मोलाची भूमिका पार पाडली. यात शुभम ठाकूर, मुन्ना मोरे, सुमित लाकडे, तुषार आसोले, अंकित फुटाणे, तुषार महल्ले, पियुष सूर्यवंशी यांच्या सहकार्याने दोन्ही मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पोलीस निरीक्षक अंकुश खडसे आणि सहकारी घटनास्थळी असून आज अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांनीही भेट दिली.
मात्र, या युवकांना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात ते बुडू लागले. सोबतच्या अन्य मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणालाही वाचवता आले नाही. घटनेची माहिती मिळताच खापा पोलिसांचा ताफा व हितज्योती आधार फाउंडेशनची टीम घटनास्थळी पोहोचली.
हेही वाचा