

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नायलॉन मांजाला आळा घालण्यासाठी मनपा, पोलिसांसह संबंधित विभागांनी धाडी टाकून कारवाया केल्या. मात्र, त्यानंतरही प्रतिबंधित नायलॉन मांजाचा सरसकट वापर मकरसंक्रांतीच्या आनंदात विरजण घालणारा ठरला आहे. नायलॉन मांजाने गळा कापल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. वेद साहू असे मांजाने गळा कापला गेल्याने मृत्यू झालेल्या ११ वर्षीय मुलाचे नाव आहे.
वेद साहू हा शनिवारी (दि.१५) त्याच्या वडिलांसोबत दुचाकीवर जात होता. अचानक मांजा समोर आला व त्याचा गळा कापला गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. आज संक्रांतीच्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. जखमी वेदला मानकापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे त्याच्यावर उपचार झालेच नाहीत. अखेर रात्री त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.