Bhandara : बिबट्याचा घरात तीन तास ठिय्या!

Bhandara : बिबट्याचा घरात तीन तास ठिय्या!
Published on
Updated on

पिंपळगाव को. : पुढारी वृत्तसेवा : शिकारीच्या शोधात असलेला एक बिबट्या येथील वस्तीतील घरात शिरला. तब्बल तीन तास थैमान घातल्यानंतर वन विभागाच्या मदतीने बिबट्याला हुसकावून लावण्यात आले. ही घटना लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव/को. येथे बुधवारी (दि.13)घडली.

लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव को. येथील रेवनाथ विनायक परशुरामकर यांचे घर हे जंगल व शेतीला लागून असलेल्या पिंपळगाव (को) टोळीवर आहे. पिंपळगाव हे गाव लाखांदूर- अर्जुनी मार्गावर असून लाखांदूर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील आणि जंगलालगत आहे. त्यामुळे येथे वन्यप्राण्यांचा मुक्त संचार नेहमीच पहायला मिळतो.

शिकारीच्या शोधात असलेला एक बिबट्या बुधवारी सायंकाळी रेवनाथ विनायक परशुरामकर यांच्या घरात शिरला. बिबट्या घरात शिरल्याचे समजताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी घरात शिरलेल्या बिबट्याला बघण्यासाठी गर्दी केली. दरम्यान, येथील काही ग्रामस्थांनी प्रसंगावधान साधून दरवाजाची बाहेरून कडी लावली आणि बिबट्या घरात जेरबंद झाला.

हा बिबट्या घरात असल्याची माहिती, लाखांदूर वन विभागाला देण्यात आली. या माहितीवरून लाखांदूर वन विभाग व पोलिस विभागाच्या चमूने तात्काळ घटनास्थळी पोहाचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवत ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले. तब्बल तीन तास हा बिबट्या घरातच बंद होता.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रियंका बोरकर, डॉ. प्रतीक उईके, तहसीलदार वैभव पवार, नायब तहसिलदार अखीलभारत मेश्राम, पोलिस निरीक्षक रमाकांत कोकाटे, वनपरिक्षेत्रधिकारी रुपेश गावित, पोलिस उपनिरीक्षक मांदाळे, दिघोरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पवार, आय.जी.निर्वाण ढोले, हत्ते व पोलिस कर्मचारी सुभाष शहारे, गायकवाड, वन विभागाचे कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता.

लाखांदूर तालुक्यातील काही गावांना लागून जंगल परिसर असल्याने अनेकदा तालुक्यातील जंगल परिसर गावात किंवा गावालगत वन्य प्राण्याचा मुक्त संचार पाहावयास मिळतो. मात्र, अचानक एक बिबट्या घरात शिरल्याने गावात खळबळ माजली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news